कोल्हापूर | कमांडो हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली फसवणूक, आयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या



कमांडो हाप मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली देशभरातुन आलेल्या अडिच हजारांहून अधिक स्पर्धकांची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री समोर आला असतानाच, आज सकाळी आयोजक वैभव भैरू पाटील (२४,रा.तिरपण,ता. पन्हाळा) याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

याप्रकरणी वैभव पाटील आणि त्याची पत्नी पुनम (२४) या दोघांविरोधात कॉन्ट्रॅक्टर व्यवसायिक व स्पर्धक मल्लाप्पा तीरवीर (रा.हरिप्रिया नगर, पाचगाव, कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री संशयित पुनम पाटील हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहुपुरी बेकर गल्ली, येथील मराठा कमांडो (Commando ) सिक्युरिटी फोर्स कार्यालय असुन, येथुन गेल्या महिन्यात दि. १६ सप्टेंबर ते आज अखेर फिर्यादीसह इतर साक्षीदार स्पर्धकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने, वैभव पाटील याने कमांडो हाफ मॅरेथॉन कोल्हापूर-२०२२ ही स्पर्धा आयोजित केल्याचे भासवले.स्पर्धेची खोटी जाहिरात पत्रक काढले. सोशल मीडियाद्वारे खोटी जाहिरात देऊन सुमारे २ हजार ५०० स्पर्धकांना पैसे भरण्यास भाग पाडले. त्यापैकी फिर्यादी यांच्याकडे सध्या ६८० फसवणूक झालेल्या स्पर्धकांची यादी असुन, या स्पर्धेसाठी आतापर्यंत सुमारे ७२० स्पर्धकांची आठ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. वैभव पाटील आणि त्याची पत्नी पुनम या या दोघांनी विश्वासघात करून,ही फसवणूक केल्याच्या फिर्यादी करून ही तक्रार नोंदविण्यात आली आहे.

स्पर्धेची तारीख जवळ आल्यानंतरही संपर्क होत नसल्याने, फसवणूक झालेले स्पर्धक काल (शनिवारी) रात्री उशिरा शाहुपुरी पोलिस ठाण्यात एकत्र आले. त्यानंतर पोलिसानी संशयित पूनम पाटील हिला ताब्यात घेतले होते.तर वैभवचा फोन बंद असल्याने तो आढळला नाही. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच,वैभवने मध्यरात्री गावातील शेतातील झाडाला फास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments