अपहार : ‘पंढरीची वारी’ पोस्ट कार्डांमध्ये 3 लाख 80 हजारांचा अपहार? तत्कालीन डाक अधीक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल



पंढरपूर |

‘पंढरीची वारी’ या नावाने पोस्टकार्ड छपाईचा अधिकार नसताना एका खासगी कंपनीकडून ती करून घेणे, त्या कार्डांच्या विक्रीद्वारे जमा झालेले पैसे, झालेली छपाई यामध्ये साधर्म्य नसल्याने तीन लाख ८० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोस्ट अधिकाऱ्यांसह पाच जणांवर पंढरपूर शहर पोलिसांत शनिवारी (दि.२२) रात्री साडेदहाच्या दरम्यान न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

 हा प्रकार सन २०१६ ते २०१७ या कालावधीत झालेला आहे. विश्वविजय तुकाराम गोरे (रा. नातेपुते, माळशिरस), अनिल देवदत्त गायकवाड (उमा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसासटी, जुनी मिल) यांनी पंढरपूर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. सन २०१९ पासून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. पण, गुन्हा दाखल न झाल्याने पंढरपूर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात करण्यात आली होती.

पंढरपूर विभागाचे तत्कालीन डाक अधीक्षक सूर्यकांत सिताराम पाठक (६०, रा. सोलापूर) तत्कालीन जनरल पोस्ट मास्तर गणेश व्ही. सावळेश्वर (५८, रा. मुंबई) सेवानिवृत्त अधिकारी सुभाष भागवत वाळुंज ( वय-६२, नवी सांगवी पिंपळे गुरव, पुणे ) धनाजी बाबुराव वाळके ( वय-६२, कुर्डुवाडी, ता. माढा) हनुमंत जे.काकडे ( वय-६२, रा. शहरूनी, पिंपरी पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

पोस्टकार्डची छपाई वरिल पाच जणांनी मिळून आशिष एंटरप्रायझेस पुणे यांच्या छपाई कार्यालयात पोस्टकार्ड ‘पंढरीची वारी’ छपाई केली. सन २०१६ मध्ये त्याची किंमत १६ हजार होती. सन २०१७ मध्ये २५ हजार कार्डची विक्री केली. म्हणजे, ५० हजार रुपये जमा नसून त्याचे दप्तर देखील उपलब्ध नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून विश्वविजय गोरे व अनिल गायकवाड या दोघांनी लेखी स्वरुपात माहिती मागवली होती. त्यांनाही दप्तर उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. एकूण माहितीवरून विक्री केलेल्या कार्डद्वारे ८ लाख रुपये जमा होणे अपेक्षित असताना त्यासंदर्भातील दप्तर नाही. ४ लाख १९ हजार ५०० रुपये उपलब्ध असल्याची नोंद आहे. गणेश सावळेश्वर हे त्या कालावधीत पुणे डाक कार्यालयात पोस्टमास्तर जनरल, या पदावर कार्यरत होते. अन्य सहकाऱ्यांच्या साथीने व संगनमताने सन २०१६ व सन २०१७ या कालावधीत कार्डची छपाई केली. पण, विक्री केल्याची दप्तरी नोंद नाही. त्यासंदर्भातील तक्रार अर्ज दिल्यानंतर खुलासा देखील करण्यात आलेला नाही. शासकीय रकमेचा अपहार केला. पोस्ट कार्डाची छपाई पूर्वी त्याचे गॅझेट करण्यात येते. पण, तेही करण्यात आलेले नाही. सन २०१६ व २०१७ मध्ये २५ हजार कार्डांची विक्री झाली असून त्या संदर्भात कोणत्याही नोंद नाहीत.

एकूण माहितीनुसार ८ लाखांचे कार्ड विकले असून दप्तरी नोंद ४ लाख १९ हजार ५०० रुपयांची आहे. उर्वरीत ३ लाख ८९ हजार रुपयांचा अपहार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे, पोलिस तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे. या संदर्भात फिर्यादीने पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. पंढरपूर पोलिस व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. पण, त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. यानंतर पंढरपूर न्यायालयात ५ जणांच्या विरुद्ध खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये पंढरपूर शहर पोलिसांनी तो गुन्हा शनिवारी दाखल केला. 

माहिती अधिकार कायद्यामुळे आणखी एक अपहार उघडकीस

सदर प्रकरणातील फिर्यादी विश्वविजय गोरे व अनिल गायकवाड यांनी पोस्ट तिकीट छपाई व विक्री संदर्भातील सर्व माहिती ही ‘माहिती अधिकार कायदा’ अंतर्गत मागवून या प्रकरणातील अपहर उघडकीस आणल्यामुळे पुन्हा एकदा माहिती अधिकार कायद्याचे समाजातील व प्रशासनातील अपहर उघडकीस आणण्यामध्ये असणारे महत्त्व अधोरेखित झाले आहे

Post a Comment

0 Comments