धक्कादायक ! बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे पतीनेच केली पत्नीची बदनामी
पतीपत्नीच्या वादात पतीने आपल्या पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील याप्रकरणी खराडी येथे राहणार्‍या एका ४८ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३३७/२२) दिली आहे. त्यानुसार गोव्यातील त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुण्यात रहात असून त्यांचे पती सध्या गोव्याला राहत आहेत. पतीने त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनविले. त्यावर फोटो, बदनामीकारक व मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करुन वेगवेगळ्या लोकांना फ्रेन्ड सिक्वेस्ट पाठविली. “कॉल मी” असा संदेश पाठविला.

त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या लोकांचे कॉल येऊ लागले. ते त्यांच्याशी अश्लिल भाषेत बोलू लागले. सुरुवातीला त्यांना हे समजले नाही. त्यानंतर आपल्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आल्याचे त्यांना समजले. त्याची त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी तपास केल्यावर हे बनावट अकाऊंट दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांच्याच पतीने तयार करुन बदनामी केल्याचे उघड झाले. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments