सोलापूर | सोशल मीडियातून तरुणीची ओळख मुलीच्या घरच्यांनी धमकावल्यामुळे किशोरवयीन मुलांनी केली आत्महत्यासमाज माध्यमांतून झालेल्या ओळखीतून कोल्हापूरच्या तरूणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधाला तिच्या घरच्या मंडळींनी कडाडून विरोध करून सतत धमकावल्यामुळे वैफल्यग्रस्त सोलापूरच्या किशोरवयीन शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी संबंधित तरूणीसह तिच्या आई-वडील, भाऊ आणि बहीण अशा पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चांदगड तालुक्यातील हालकर्णी गावात राहणाऱ्या वैष्णवी विठोबा नाईक (वय २३) हिच्यासह तिची आई वैशाली विठोबा नाईक (वय ४५), वडील विठोबा मल्लप्पा नाईक (वय ५०), भाऊ पांडुरंग विठोबा नाईक (वय ३०) आणि बहीण विजया विठोबा नाईक (वय २२) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.
आत्महत्या केलेला मुलगा १६ वर्षाचा असून तो माध्यमिक शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता.


 कर्णिकनगरात आई-वडिलांसोबत राहणाऱ्या या मुलाची एक वर्षापूर्वी वैष्णवी नाईक हिच्याशी समाज माध्यमांतून ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. वैष्णवी ही मुलाकडे आॕनलाईन कपडे व खाण्याचे पदार्थ मागवून घ्यायची. मोबाइल रिचार्जही करून घ्यायची. तसेच आॕनलाईन पैसैही मागवून घ्यायची. प्रेमाने वेडापिसा झालेला किशोरवयीन मुलगा तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायचा. वैष्णवी हीसुध्दा अधुनमधून सोलापुरात येऊन मुलाची भेट घेऊन प्रेमाच्या, लग्नाच्या आणाभाका घेत असे. मात्र आपल्या मुलीचे हे प्रेमसंबंध तिच्या घरात समजले. तेव्हा तिचे वडील विठोबा आणि भाऊ पांडुरंग हे मुलास फोन करून प्रेमसंबंध तोडून टाकण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. मुलगा अज्ञान असल्यामुळे त्याने भीतीपोटी आपल्या आई-वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. 

मात्र घडलेले प्रकार त्याने एका डायरीत नोंद करून ठेवले होते. तसेच वैष्णवीच्या घरातील मंडळींकडून येणारे धमक्यांचे फोनही रेकाॕर्ड करून ठेवले होते. अलिकडे १७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास वैष्णवीच्या घरच्या मंडळींनी प्रेमसंबंध न तोडल्यास सोलापुरात येऊन तुला आणि तुझ्या आई-वडिलांना मारून टाकतो, अशी धमकी दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मुलाने टोकाला जाऊन आत्महत्येचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, त्याने आत्महत्या करण्यामागच्या कारणे विशद करणारे स्वहस्ताक्षरात पत्र तसेच मोबाइलवर यापूर्वी आलेल्या धमक्यांचे रेकॉर्ड तयार करून घरात टेबलावर ठेवले आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments