माढा/प्रतिनिधी:
आज दि.23 रोजी विधानभवनासमोर सातारा जिल्ह्यातील शेतकरी सुभाष भानुदास शिंदे यांनी अंगावर ज्वालाग्राही द्रव्य ओतुन घेवुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सरकारी धोरणांच्या अनास्थेला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत थेट विधानभवनासमोर हा प्रकार केला आहे.. आता याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिंदे फडणवीस सरकारवर टिका केली आहे.
'राज्यातील शेतकर्यांना सरकारचा काडीचाही फायदा मिळत नाही,उलट सरकारने शेतकरी विरोधी धोरणे अवलंबल्याने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे मात्र सरकारला याचे काहीही देणेघेणे उरलेले नाही, सरकारला आणखी किती शेतकर्यांचे जिव घ्यायचे आहेत असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केला आहे.
विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी व महापुराने अडचणीत सापडला असताना अधिवेशनात मुख्यमंत्री हास्यकल्लोळात रमतात हे दुर्दैव आहे. शेतकर्यांना या सरकारकडुन मदतीची अपेक्षा असताना सत्ताधारी मात्र या मदतीच्या बाबतीत चालु अधिवेशनात घोषणा राहुद्या साधा 'ब्र' शब्द काढायला तयार नाही.
दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री "अडीच एक म्हणजे तीन हेक्टर ना." असा नवा जावईशोध लावतात. या राज्याच्या कृषीमंत्र्यांना साधा हेक्टर आणि एकर मधिल फरक समजत नाही. आणि अशा लोकांकडे राज्यातील कृषीविभागाची धुरा आहे. यामुळेच आता राज्यातील शेतकर्यांचे भवितव्य रामभरोसे आहे हे अधोरेखित होते असेही बोलताना बागल म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री "हे सरकार शेतकर्यांचं आहे" असं ढोल बडवतात आणि याच राज्यातील शेतकरी विधानभवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न करतो. ही चीड आणणारी बाब आहे. सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांची चेष्टा न करता तात्काळ मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरून या लबाड व बोलघेवड्या सरकारचा बुरखा फाडु असा इशारा देखील यावेळी बागल यांनी दिला आहे.
0 Comments