“राहुल गांधींनीच काँग्रेस नेत्याचं शर्ट फाडलं, कारण…”; भाजपाचा खळबळजनक आरोप!



काँग्रेसने शुक्रवारी काळे कपडे परिधान करुन देशातील महागाई,   बेरोजगारी आणि आवश्यक वस्तूंवरील जीएसटीचा विरोध करत निदर्शनं केली. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून आंदोलनाला सुरुवात झाली.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा आंदोलनाचं नेतृत्व करत होते. यावेळी पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यात राहुल आणि प्रियांका यांचाही समावेश होता.  या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर राहुल आणि प्रियांका राजकारणाचा तमाशा करत असल्याची टीका भाजपाकडून केली गेली.

आता भाजपाच्या आयटी विंगचे प्रभारी असलेल्या अमीत मालवीय यांनी एक फोटो ट्विट करत थेट राहुल गांधी यांच्यानवर सनसनाटी आरोपी केला आहे. मालवीय यांनी ट्विट केलेल्या फोटोत काँग्रेस नेते दीपेंद्र एस हुड्डा आणि राहुल गांधी पोलिसांसोबत संघर्ष करत असताना दिसत आहेत. पण पोलिसांनी नव्हे, तर स्वत: राहुल गांधी यांनीच दीपेंद्र हुड्डा यांचं शर्ट फाडलं असा आरोप मालवीय यांनी केला आहे. “राहुल गांधी यांनी आपल्याच सहकारी दीपेंद्र हुड्डा यांचं शर्ट फाडलं. जेणेकरुन एक चांगलं फोटोसेशन होऊ शकेल आणि दिल्ली पोलिसांना दोषी ठरवता येईल”, असं ट्विट अमीत मालवीय यांनी केलं आहे.


प्रियांका गांधींवर पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप
अमित मालवीय यांनी याआधी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावरही आरोप करत आंदोलनावेळी प्रियांका यांनी पोलीस कर्मचाऱ्याला हात पिरगळल्याचा आरोप केला आहे. याचाही एक फोटो मालवीय यांनी ट्विट केला आहे. तसंच प्रियांका यांनी पोलिसांना लाथ मारल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


“ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रियांका गांधी यांनी मारहाण केली. त्यांचा हात पिरगळला आणि लाथा मारल्या. नंतर पोलिसांनीच मारहाण केली अशी तक्रार करू लागल्या. पण सत्य वेगळंच आहे”, असं ट्विट अमित मालवीय यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments