सोलापूर! भ्रष्ट अधिकार्‍यांविरुध्द योगेश पवार यांचे 'गांधीगिरी' आंदोलन


सोलापूर/प्रतिनिधी:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व उपअधीक्षक संजीव पाटील यांचेकडील तपास सीबीआय किंवा ईडीकडे द्यावा, आणि एसीबीचे अधिकारी राजेश बनसोडे व संजीव पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी, 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी योगेश पवार यांनी महात्मा गांधीची वेशभूषा करून अभिनव पध्दतीने गांधीगिरी आंदोलन केले. विशेष म्हणजे योगेश पवार यांनी अंगावर एसीबीच्या निषेधाचे स्टीकर चिटकावून, महात्मा गांधीच्या वेशभूषेमध्येच जिल्हाधिकारी व एसीबीच्या अधिकार्‍यांना स्मरणपत्र ही दिले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, विशेष कोर्टाच्या आदेशान्वये, दि. 20/07/2021 रोजी सदर बझार पोलीस स्टेशन यांचेकडे गुन्हा रजि. 456/2021, नुसार माजी महापौर मनोहर सपाटे व लता जाधव यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमचे कलम 13(1)ड, 13 (2) आणि भांदवी कलम 120 (ब), 196, 406, 408, 409, 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आहे. परंतु, सदर गुन्ह्यात एसीबीच्या पुणे व सोलापूर येथील अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे तपास न करता, या गुन्ह्यातील आरोपीकडून आर्थिक स्वरुपात लाच घेवून, व स्वत:च्या पदाचा गैरवापर करून एसीबीचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे व उपअधिक्षक संजीव पाटील यांनी आरोपी मनोहर सपाटे यांस बेकायदेशीरपणे सहकार्य केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्ते योगेश पवार यांनी स्मरणपत्रातील निवेदनात केलेला आहे. तसेच एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी योगेश पवार यांनी महात्मा गांधीच्या वेशभूषेत केलेल्या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा दिवसभर रंगली होती.

Post a Comment

0 Comments