स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर विद्यापीठात तिरंगा रॅली, ध्वज वाटप!



सोलापूर ;

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठ कॅम्पसमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. तसेच महिला शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिरंगा वेशभूषा परिधान करून अमृत महोत्सवाच्या 75 अंकाचे अनोखे सादरीकरण केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने रॅली काढण्यात आली. आज शुक्रवारी सकाळी विद्यापीठ कॅम्पसमधील दीक्षांत मैदानावर सर्व महिला शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत तिरंगा वेशभूषा परिधान करून अमृत महोत्सवाच्या 75 अंकाचे विशेष सादरीकरण केले. याचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रण करण्यात आले. यात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या स्वतः सहभागी झाल्या होत्या. याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमधून तिरंगा रॅली करण्यात आली. यावेळी हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देऊन देशभक्तीचा जागर केला. 

या कार्यक्रमाचे नियोजन पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, कुलगुरूंचे स्वीय सहायक माधवी पारेकर, कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा कांचन आघाव, अनिता आडगावकर आदींनी केले. याचबरोबर विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याचे नियोजन विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, राष्ट्रीय सेवा विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments