सोलापूर:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण 262 प्रकारची कामे अनुज्ञेय आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांसाठी असणारी कामे जसे सिंचन विहीर, शेततळे, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, बांधबंदिस्ती, गुरांचे गोठे, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, अझोला खड्डा, नाडेप टाके व गांडूळ खत टाके व अन्य वैयक्तिक लाभाची कामे घेऊन लाभार्थी स्वतःसाठी व स्वतःच्या कामासाठी (स्वतःची मत्ता तयार होणेसाठी) मग्रारोहयोमध्ये काम करुन स्वतःसाठी कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन निर्माण करु शकतो. म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारा मजुर हा मजुर न राहता तो आत्मनिर्भर होणार आहे. यामुळे त्याचे जीवनमान उंचविणार असून तो लखपती होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशिला देशमुख-मोहिते यांनी दिली. मग्रारोहयो अंतर्गत भूमिहीन मजुरांसाठी असणारी कामे जसे की, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, गुरांचा गोठा, नाडेप, गांडूळ खत टाके बांधकाम इत्यादी कामे मजूर कुटुंबाना घेता येतात. तसेच किमान 100 दिवस एका कुटुंबाने काम केले तर व्यवसाय प्रशिक्षणाची संधी प्राप्त होते. प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट असतात. या गटांना आपण विविध प्रकारची कामे देऊ शकतो जसे की, सामुदायिक शेततळे, मत्स्य पालन तळे, पाझर तलाव, गट स्तरावर अन्नधान्याचे साठवण गोदाम, बचत गटासाठी इमारत बांधकाम इतर प्रकारची कामे देऊ शकतो.
सार्वजनिक लाभाच्या योजनामध्ये गावस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते व नाली बांधकाम, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम शाळा किंवा अंगणवाडी शौचालय बांधकाम, तलाव बॉडी नाला खोलीकरण, बंधारा बांधकाम व दुरुस्ती, वृक्ष लागवड इत्यादी कामे गावाअंतर्गत व शिवारात घेता येतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करण्याऱ्या मजुरांना 256 रुपये मजुरी प्रति दिवस दिली जाते. ही मजुरी कमी असल्यामुळे अनेक मजुर योजनेच्या कामावर येण्यास टाळतात. परंतु एखाद्या लाभार्थ्याने आपल्या घरी गुरांचा गोठा हे काम केल्यास त्याने फक्त मजूर म्हणून काम न करता स्वतःसाठी व स्वतःच्या कामासाठी (स्वतःची मत्ता तयार होणेसाठी) रोहयोच्या कामावर यावे.
उदाहरणार्थ एखादा लाभार्थी व त्याची पत्नी स्वत:च्या घरी गुरांचा गोठा या कामावर काम करीत असल्यास त्याला फक्त 256 रुपये मजुरी मिळत नसून त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रति दिवस मिळत असतो, तो कसा ते समजून घेऊ. गुरांच्या गोठ्याची किंमत एकूण किंमत - 77400 रुपये, अकुशल - 6400रुपये, कुशल-71000 रुपये, एकूण मनुष्य दिवस-25, पती - पत्नी मिळून काम केल्यास 12 मनुष्य दिवस प्रत्येकास मिळतील. त्यानुसार दोन आठवड्यात काम पूर्ण होईल. 12 दिवसात काम पूर्ण झाल्यास त्या कुटुंबासाठी अकुशल व कुशल प्रति दिवस 6450 रुपये प्रति दिवस शासन खर्च करेल. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला 6431 रुपये यानुसार प्रती दिवस मजुरी मिळेल व त्या मजुराला 3225 रुपये रोज मिळू शकणार असल्याचे श्रीमती देशमुख मोहिते यांनी सांगितले.
जुनी रोहयो व मग्रारोहयोमधील फरक ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर यांना लखपती करण्यासाठी योजना नव्या पध्दतीने राबविली जात आहे. यामध्ये वैयक्तिक कामांवरील लाभार्थी यांना मजुरी देणे, मजुरीतून मालमत्ता निर्माण करणे, मालमत्तेतून शेतकरी, शेतमजूर यांचे जीवनमान उंचावणे यासाठी मनरेगा काम करत आहे. मजुरांना 15 दिवसांच्या ऐवजी आठ दिवसात मजुरी अदा केली जात आहे. मजुरी अदा करताना थेट मजुरांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे मजुरी अदा केली जात आहे. त्यामुळे बनावट खाती अथवा व्यक्तींच्या नावावर रक्कम हस्तांतरण करुन भ्रष्टाचार करणाऱ्यावर चाप बसला आहे.
वैयक्तीक व सार्वजनिक कामांचे तीन वेळा जिओ टॅगिंग झाल्याने (काम सुरु करण्यापूर्वी, काम चालू झाल्यावर, काम पूर्ण झाल्यावर) होत असल्याने पारदर्शकता वाढली आहे. मनरेगामध्ये ठेकेदाराचा समावेश नाही. मजूर विस्थापित होतील अशा यंत्रसामग्री वापरण्यावर बंदी आहे. सामाजिक अंकेक्षण होत आहे, त्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी 100 दिवसाच्या रोजगाराची हमी केंद्र शासनाने दिली व उर्वरीत 265 दिवसाच्या रोजगाराची हमी राज्य शासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजुर यांनी वैयक्तिक कामांसाठी लाभ घेण्याबाबत व शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत यांनी सार्वजनिक कामे घेण्याबाबत श्रीमती देशमुख मोहिते यांनी आवाहन केले आहे.
0 Comments