मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध चांगल्या आणि मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. तितक्याच वेगाने त्यांची कामं सुरु आहेत. ते गरजेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवरही धरत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापक विभागाच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करण्यापासून ते ठाण्यासाठी नवं धरण उभारण्याबाबतची घोषणा असेल, त्यांच्या कामांचा सपाटा सुरुच आहे. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकीचं दर्शन घडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना पाय घसरुन पडली.
या महिलेला एकनाथ शिंदे यांनी स्वत: हात दिला. तिची विचारपूस केली आणि रुग्णालयात दाखल करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला मदतीचा हात दिला. रुपाली साळुंखे या महिला पोलीस कर्मचारी पाय घसरून पडल्या. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी महिला पोलिसाला मदतीचा हात दिला. त्यांनी स्वत: महिला पोलिसाला पाणी दिलं. तसेच महिला पोलिसाला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करुन योग्य उपचार द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील स्वभाव याआधी विधानसभेच्या सभागृहातही बघायला मिळाला होता. सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री भावूक झालेले महाराष्ट्राने पाहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरु केली. मुख्यमंत्र्यांनी आज तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील महत्त्वाची घोषणा म्हणजे त्यांनी पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफ केलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने यावर्षी पंढरपूरात मोठ्या प्रमाणा गर्दी वाढेल. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा.
ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॉस्पिटल नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे. ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे
0 Comments