मंगळवेढा! लाच प्रकरणातील मंगळवेढ्याचे पुरवठा निरीक्षक निलंबित


मंगळवेढा/प्रतिनिधी:

 येथील पुरवठा निरीक्षक उत्तम वामन गायकवाड यांनी बाराशे रुपये मासिक हप्त्याची लाच स्वीकारल्या प्रकरणात त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले असून, तसा आदेश मंगळवेढा तहसीलला प्राप्त झाला आहे.

निलंबित पुरवठा निरीक्षक गायकवाड हे मंगळवेढा येथील पुरवठा विभागात कार्यरत होते. २७ मे रोजी यातील स्वस्त धान्य दुकानदाराने लाचेबाबत सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. यावेळी पुरवठा निरीक्षक गायकवाड यांच्यावतीने मासिक हप्ता म्हणून बाराशे रुपयांच्या लाचेची मागणी करीत संगणकचालक यादव याने ती रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

यावेळी ही रक्कम पुरवठा निरीक्षकांकडे देणार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. याचा अहवाल लाचलुचपत विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश नुकताच मंगळवेढा तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे. दरम्यान, त्यांची बदली माढा येथे करण्यात आली असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये तसेच निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारू नये, तसे केल्यास दोषारोपास पात्र राहाल, असे आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments