करमाळा/प्रतिनिधी:
करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी आम्हाला मतदान केले नाही. असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, मी सूचनेप्रमाणे मतदान केले असून, मी घोडेबाजार केला नाही, असे आ. शिंदे यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर सध्या महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसत आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. त्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा हा सामना रंगला होता. भाजपचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय पवार यांच्यात अत्यंत चुरशीची ही निवडणूक झाली.
आमदार संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला होता. मुंबईत आमदारांच्या झालेल्या बैठकीतही त्यांनी हजेरी लावली होती. मात्र शिवसेनेचे पवार यांना मतदान कमी झाले असल्याने आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. महाडिक यांना ४१ तर पवार यांना ३३ मते मिळाली आहेत. त्यामुळे पवार यांना महाविकास आघाडीतील काही आमदारांनी मतदान केले नाही. काही अपक्ष आमदारांनीही मतदान केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिवसेनेचे राऊत यांनी प्रतिक्रिया देताना बहुजन विकास आघाडी तसेच, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदान दिले नसल्याचे राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार शिंदे म्हणाले कि, "संजय राऊत यांचे आरोप चुकीचे आहेत. सूचनेप्रमाणे मी मतदान केले आहे. मी कोणताही घोडेबाजार केलेला नाही". राऊत असा आरोप का करत आहेत? पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले कि, हे त्यांनाच विचारले पाहिजे. माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे, मी घोडेबाजारातील नाही. हे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्या नेत्यांपुढे हा विषय मांडला जाईल. विश्वास नसेल तर त्यांनी मत पहायला पाहिजे होते, असेही शिंदे म्हणाले आहेत
0 Comments