राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणाला पत्ते खोलले! विधानपरिषदेसाठी दोघांची वर्णी!


विधान परिषद निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. विविध पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. भेटीगाठी वाढल्या असून सगळ्यांनी मुंबईत ठाण मांडलंय. आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.

आतापर्यंत भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केलीय. आणि आज सहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यसभेसारखी परिस्थिती विधानपरिषदेवेळी असणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शरद पवार मुंबईतून पुण्यात दाखल झाले. त्यामुळे सस्पेन्स वाढला. मात्र राष्ट्रवादीनेही दोन नावांची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिलीय. राष्ट्रवादीच्या गोटातून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेतली. यानंतर दोघांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं.

मात्र, शिवाजीराव गर्जे, अमरसिंह पंडित हे देखील इच्छुक असल्याने राष्ट्रवादीने चित्र स्पष्ट केलं नाही. अखेर रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल मिळाला आहे. रामराजे निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवण्यात आलं होतं. पण अजूनही राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली नसल्याने आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments