बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील तोतया डॉक्टरला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा बार्शी सत्र न्यायालयाने सुनावली आहे. नंदकुमार रामलिंग स्वामी असे तोतया डॉक्टराचे नाव आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना यास वैद्यकीय साधनसामग्री जवळ बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील म्हणून सुनील जोशी यांनी काम पाहिले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. केमकर यांना स्वामी वाहनामध्ये गर्भलिंग निदान व गर्भपात करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी पोलिसांना बरोबर घेवून जातेगाव गाठले. तेथे एका कार मध्ये लिंगनिदानाचं साहित्य घेवून बसलेल्या स्वामी याच्याकडे एका गर्भवती स्त्रीला पाठविण्यात आले. त्या स्त्रीनं गाडीत प्रवेश करताच छापा मारुन स्वामीजवळील सोनोग्राफीयुक्त लॅपटॉप आणि शस्त्रक्रियासंबंधित साहित्य जप्त करण्यात आलं. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तत्कालीन पो.नि. राजेश देवरे यांनी दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयीन सुनावणीत तपासणीला गेलेली स्त्री गरोदर असल्याचा पुरावा समोर आला नाही. स्वामी गर्भलिंगनिदान करत असल्याचे सिध्द करण्यात अभियोग पक्षास अपयश आले. विश्वासार्ह पुरावा नसल्यामुळे त्यास निदानाच्या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले.
0 Comments