आषाढी एकादशीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, अनिल परबांची मोठी घोषणा


आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी बुधवारी केली.

6 जुलै ते 14 जुलै, 2022 दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी (8 जुलै) 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती यासहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली. गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.

त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहोळा होणार आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Post a Comment

0 Comments