अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना काही दिवसांपूर्वी मुंबई अटक झाली होती. ते जवळपास दोन आठवडे वेगवेगळ्या जेलमध्ये होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यावरुन राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं.
त्यावेळी झालेल्या मोठ्या गदारोळानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. संबंधित प्रकरणी राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली होती. पण आता अमरावतीच्या एका वेगळ्या प्रकरणी राणा दाम्पत्याच्या मुंबई येथील घरी पोलीस दाखल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरणात हायकोर्टाचं वॉरंट निघालं आहे. त्यामुळे राजापेठ पोलिसांचे पथक आणि मुंबई पोलिसांचे पथक रवी राणा यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर पोहोचले आहे. संबंधित प्रकरणावर रवी राणा यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. “अमरावतीहून पोलीस आले होते. त्यांच्यासोबत मुंबई पोलीसही होते.
अमरावती आणि मुंबई पोलीस मला अटक करण्यासाठी माझ्या खार येथील फ्लॅटवर अटक वॉरंट घेऊन आले होते. पण मी घरी नसल्याने ते मला अटक करु शकले नाहीत. भाजपला मी मतदान करु नये या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दबाव आहे. त्यातून अमरावतीच्या पोलीस कमिश्नर यांनी अटक वॉरंट घेऊन पोलिसांना घरी पाठवलं.
याला मी कायदेशीर उत्तर देईन. मी भाजपच्या उमेदवारांना विधान परिषद निवडणुकीत मत देईन. भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील. मी दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. ('मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल', देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा) अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून आयुक्तांवर शाईफेक केल्या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या रागावरून मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर रवी राणा यांनी अटकेपासून संरक्षण म्हणून दिल्लीच्या कोर्टातून ट्रान्झिट अॅन्टिसिपेट्री बेल मिळवली होती. मात्र 28 फेब्रुवारी रोजी ट्रान्झिट अॅन्टिसिपेट्री बेल संपली. त्यामुळे रवी राणा यांचे वकील अॅड. दीप मिश्रा यांनी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी अमरावती जिल्हा न्यायालयाने राणांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
0 Comments