भूम परांडा वाशी मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाहीये. केवळ गाडीचं किरकोळ नुकसान जालं असल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत हे भूम-परंड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे हा अपघात झाला. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. उस्मानाबादहून ते पुण्याला निघाले असताना हा अपघात झाला.
आमदार तानाजी सावंत हे नाराज असून भाजपत प्रवेश करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेवर आमदार तानाजी सावंत यांनी शनिवारी मौन सोडलं. आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं, मी एकवेळ घरी बसेन पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. उस्मानाबाद येथे शिवसंपर्क अभियाना दरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.
0 Comments