एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर; ठाकरेंना दिले आव्हान!



शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलात ८ दिवसांपासून मुक्कामाला आहेत. शिंदे यांनी आज (दि.२८) रॅडिसन हॉटेलबाहेर येत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली. गुवाहाटीतील आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी खोडून काढत शिवसेनेने त्या आमदारांची नावे सांगावीत, असे थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लवकरच आम्ही मुंबईत परतणार आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिंदे गटाची भूमिका आमच्या गटाचे अधिकृत प्रवक्ते दीपक केसरकर मांडत आहेत. आम्ही शिवसेनेला पुढे घेऊन निघालो आहोत. शिवसेनेचे ५० लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत. ते सर्वजण आनंदी आहेत. बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते आले आहेत. ते काही स्वार्थासाठी आलेले नाहीत.

दरम्यान, शिवेसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात लवकर महाराष्ट्रात परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. त्यांच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील संबंध बिघडत आहेत. पंतप्रधानांबद्दल जगभरात आदराचे स्थान आहे. जगभर पंतप्रधानांचे कौतुक होत आहे. परंतु शिवसेनेकडून त्यांच्यावर विखारी टीका होत आहे. हे बरोबर नाही. आम्ही भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला पाठिंबा म्हणून गुवाहाटीतील आमदार फोन स्वीकारत नाहीत. पण मुंबईतून येणारे फोन आदरापोटी घेत आहेत, असेही ते म्हणाले.

शिवसैनिक रस्त्यावर उतरला, तर तो कोर्टाचा अवमान ठरेल. आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आमच्या भावनांचा अंत पाहू नका. यापुढे जशाच तसे उत्तर देऊ. त्यांच्याकडे जर संख्याबळ असेल तर, महाविकास आघाडीने बहुमत चाचणी घ्यावी. राज्यपाल्यांना टोमणे का मारता ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

0 Comments