ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यु,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उपळे रोडवर घडली. दादासाहेब श्रीमंत नलवडे (वय ५२) रा. हळदुगे, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात ट्रॅक्टर चालका विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीनुसार, दि. ५ मे रोजी रात्री साडेआठ वाजता मी जेवण करुन फेरफटका मारत असताना, माझा मेहुणा हणुमंत राजाराम काटे रा. हळदुगे, ता. बार्शी हा माझ्याजवळ येऊन म्हणाला की, आता रात्री नऊ वाजता लाईट येणार आहे, तेव्हा मी शेताला पाणी देऊन येतो. असे सांगून तो त्याच्याजवळील मोटरसायकल क्र.एमएच-१२-एनएच-२११० वरुन त्याचे शेताकडे गेला व मी माझे घरी गेलो.
परंतु माझा मेहुणा शेतात न जाता तो त्याच्या मोटरसायकल वरुन उपळे येथे जात असताना त्याचा अपघात झाला. रात्री साडेनऊचे सुमारास गांवातील बालाजी श्रीमंत मोहिते यांनी मला फोन करुन सांगितले की, हणुमंत काटे याचा मकरंद रोटे यांच्या शेताजवळ अपघात झाला आहे, तरी तुम्ही ताबडतोब या.
मी माझ्या मोटरसायकलवरुन लगेचच अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तेथे उपळे बाजूकडून येणाऱ्या उसाने भरलेल्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरने (नंबर माहिती नाही) माझा मेहुणा चालवत असलेल्या मोटरसायकलला समोरुन जोराने धडक देऊन अपघात केल्याचे दिसले. अपघातामध्ये माझ्या मेहुण्याच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने तो जागीच मयत झाला होता.
तसेच त्याच्यासोबत असलेला गांवातील दिनकर तुकाराम मोहिते हा गंभीर जखमी झाल्याने त्यांस गांवात प्राथमिक उपचार करुन, बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. ट्रॅक्टर चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments