करमाळा/प्रतिनिधी:
अहमदनगर राज्य महामार्गावर मांगी येथील पुलावर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जागीच ठार झाला आहे. वसंत मारुती शिंदे (वय २८) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते देवळाली येथील रहिवासी आहे. अपघाताची माहिती समजताच मांगी येथील शिवम बागल, पप्पू देशमाने, गणेश देशमाने हे मदतीला धावेल.
करमाळा - नगर मार्गावर रविवारी (ता. २९) सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ठार झालेले शिंदे हे भंगाराचा व्यवसाय करतात. देवळालीतील वैदवाडी येथे ते राहतात. करमाळ्याकडून जातेगावच्या दिशेने ते जात होते. तेव्हा त्यांचा अपघात झाला असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती समजताच देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी व गावातील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती देण्यात आली असल्याचे घटनास्थळावरील उपस्थित नागरिक सांगत आहेत. एक रुग्णवाहिका आली मात्र मृतदेह घेऊन जात नाही असे सांगून रुग्णवाहिका निघून गेली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आली आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. करमाळ्यापासून अवघ्या ५- ६ किलोमीटरवर हा अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
0 Comments