हरहुन्नरी, हजरजबाबी आणि राजकारणातील जिंदादिल माणूस म्हणून उभा महाराष्ट्र ओळखतो, असे माझे ज्येष्ठ बंधूतुल्य मित्र दिलीप सोपल यांना मागच्या आठवड्यात माझे "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." पुस्तक भेट देण्याच्या निमित्ताने त्यांच्या बार्शी येथील निवासस्थानी भेट घेतली.
१९७०च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांनी ज्या बिनीच्या निष्ठावंतांची टीम बांधली. त्यातील पवारांचे आवडते बिनीचे शिलेदार म्हणून सोपल यांचा नेहमीच उल्लेख झाला. आपल्या उपजत बुध्दीमत्ता, स्वभाव आणि जिंददिलीच्या बळावर त्यांनी राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
तब्बल २५ वर्षे ते बार्शी तालुक्याचे आमदार राहिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदापासून मंत्रीपदापर्यंतची अनेक मोठी पदे त्यांनी भूषविली.विधानसभेच्या सर्व निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या चिन्हावर लढल्या हेही वेगळे वैशिष्ट्यच! गेल्या चाळीस वर्षात राज्याच्या राजकारणात घडलेल्या अनेक स्थित्यंतराचे ते साक्षीदार तर राहिलेच पण काही घडामोडीत त्यांचा सक्रीय सहभाग राहिला.
तणावग्रस्त राजकीय घडामोडीतही आपल्या खास विनोदी शैलीने वातावरण हलके करणे, ही त्यांची खासियत! साहित्य-संगीतापासून कायद्यापर्यंतचा दांडगा व्यासंग असलेल्या दिलीप सोपल यांना सिने-नाट्य निर्माते दिपक नलावडे व अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या बार्शी शाखेचे अध्यक्ष कवी सोमेश्वर घाणेगांवकर यांच्या हस्ते "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..", हे पुस्तक भेट देण्यात आले.यावेळी सूर्यकांत वायकर दादा, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल जोशी हे माझे मित्र उपस्थित होते.
-जेष्ठ संपादक, राजा माने
0 Comments