बार्शीच्या राजकारणातील प्रभावशाली गट असलेल्या माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या गळ्यात प्रथमच राष्ट्रवादीचा गमछा दिसून आला. यापूर्वी त्यांनी 1 मे रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रवेश निश्चित केला होता. आता, त्यांच्या उपस्थितीत इक्बाल पटेल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. पटेल यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
#माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी आग्रह धरला होता. त्यांनंतर, स्वतः विश्वास बारबोले यांनी राऊत गटापासून फारकत घेत राष्ट्रवादीचे टायमिंग साधले आहे. पुढील महिन्यात त्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश होत आहे. तत्पूर्वी, आज विश्वास बारबोले यांच्या सल्ल्याने आणि जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत इक्बाल पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी, निरंजन भूमकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेशावेळीच पटेल यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे, मुस्लिम चेहरा देत बारबोले यांनी आपला पहिला डाव टाकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इक्बाल पटेल हे बार्शीतील नामवंत उद्योजक असून पटेल शूजचे मालक आहेत. उद्योग, व्यापारात त्यांचं मोठं नाव असून सामाजिक, विधायक कार्यातही ते अग्रेसर असतात. पटेल यांचा प्रवेश झाल्यामुळे आता शरद पवार यांच्या उपस्थितीत कोण, कोण घड्याळ हाती बांधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments