अखेर राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल




१ मे रोजी औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत नियम मोडल्याप्रकरणी औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडकावणारे भाषण भोवणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा होत असताना पोलिसांनी १६ नियम दिले होते. त्यात भडकावणारे भाषण करू नये असं सुचित करण्यात आलं होत. मात्र, राज ठाकरे यांनी भडकावणारे भाषण केले. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा निष्कर्ष लावण्यात आला. त्यानुसार कलम १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर १६ पैकी १२ नियम मोडले असल्याचं पोलिसांनी म्हणलं आहे. त्यात चिथावणीखोर भाषण करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, आवाजाची मर्यादा ओलांडणे, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणे हे आणि असे नियम तोडल्याचं यात म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

 दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना २ मे ते १७ मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.

Post a Comment

0 Comments