ठाण्यात गस्ती करणाऱ्या पोलिसावर जीवघेणा हल्ला; एकास अटक


ठाणे :

भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर वाढलेल्या लुटमारीच्या घटना पाहता पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालकास हटकल्याने आरोपीने पोलीस हवदारावर चाकुहल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले आहेत. रणजित पालवे ( वय ४९ ) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे .

मुंबई-नाशिक महामार्गावर लुटमारीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी हद्दीत रात्र गस्त वाढविली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तडवी आणि पोलीस नाईक रणजित पालवे हे दोघे वाहनाने वडपे ते सोनाळे दरम्यान रात्रगस्ती वर तैनात होते. तेव्हा येवई येथील एका रिक्षा वरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने रिक्षाचा पाठलाग करून त्याला थांबवले.

तेव्हा रणजित पालवे यांनी रिक्षा जवळ जाऊन आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक आरोपी अंधारा फायदा घेऊन पसार झाला तर, दुसऱ्यांने आपल्या जवळील धारदार चाकून पालवेंवर हल्ला केला. या हल्ल्यात पालवेंच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. मात्र, शब्बीर तडवी यांनी प्रसंगावधान राखत आरोपीस ताब्यात घेतले आहे. या आरोपी जवळ लायटर असलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, भिवंडी न्यायालयाने १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

विशेष म्हणजे अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याविरोधात डोंबिवली व कल्याण परिसरात मारहाण व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या जवळून जप्त करण्यात आलेली रिक्षा ही सुद्धा चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. भिवंडी तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments