स्पर्धा परीक्षेतून आलेल्या नैराश्यामुळे तरुणाची पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या



वर्धा - राज्यात एकीकडे स्पर्धा परीक्षेचे घोटाळे गाजत असताना आणखी एका तरुणाने परीक्षेच्या नैराश्यातून आत्महत्या केली. कुटुंबावर आर्थिक संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिट्ठी लिहून आर्थिक मदत करत कुटुंबाची काळजी घ्या, असे लिहून कुटुंबाची माफी मागितली आहे. किशन ढगे असे या तरुणाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील आहे. तो देवळी तालुक्यातील नागझिरा येथे पशुसंवर्धन कार्यलयात परिचारक होता. त्याच ठिकाणी पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत तो एमपीएससीसह स्पर्धा परीक्षेसाठी मागील अनेक वर्षांपासून तयारी करत होता. यासोबत नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. तो देवळी येथे किरायाने राहत होता. तो सातत्याने अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते. याआधी त्याची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणांनी हुकली होती. घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले होते. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरी भरती घोटाळा, तसेच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले.

ही फेसबूक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठली असता तोपर्यंत सर्व संपले होते. पण, फेसबुक पोस्टचे पुढे काय झाले याबद्दल कळू शकले नाही. काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, लक्षात येताच त्याचा मृतदेह काढून पुलगाव रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

किशन याने अनेकदा एमपीएससीची परीक्षा दिली. तो शेवटच्या टप्प्या पर्यंत पोहचलाही. पण, प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून मुलगा अधिकारी व्हावा महणून शिक्षणावर खर्च केला. पण, अपेक्षित नोकरी मिळाली नाही. स्वप्न अधिकारी होण्याचे असताना परिचारक म्हणून काम करावे लागत होते. यामुळे कुठेतरी अधिक नैराश्य आले. हे सगळे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मांडून आपले दुःख व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments