राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांनी याप्रकरणी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले की, राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होते. त्यांना त्यांची प्रेरणा होती, ही गोष्ट खरी आहे. मात्र, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणायची आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा महापौर झाला तर आमचा उपमहापौर झाला पाहिजे. पुण्यात आमचा उपमहापौर आहे. पिंपरीत सत्ता आली तर उपमहापौरपद आम्हाला हवे आहे.
0 Comments