नाशिक जिल्ह्याच्या कळवण याठिकाणी एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक येथील भावजयीला वारंवार फोन करत असल्याच्या कारणातून दिरानेच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
घटनेनंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपी दिराला राहत्या घरातून अटक केली आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
पंकज मधुकर वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कळवण तालुक्यातील बिजोरे येथील रहिवासी होता. मृत पंकज हा बिजोरे गावातील रहिवासी असणारा रविंद्र नामदेव निकम याच्या नाशकातील भावजयीला फोन करायचा. मृत पंकज नेहमीच आपल्या भावजयीला फोन करतो म्हणून रविंद्र याला पंकजवर राग होता. याच कारणातून आरोपी रविंद्र निकम यानं धारदार शस्त्राने वार करून पंकजची हत्या केली. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत पंकज वाघ हे घटनेच्या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास शेतातील मजूर रविंद्र सोनवणे यांना आणण्यासाठी गेले होते. पण ते बराच वेळ झालं तरी परत आले नव्हते. यामुळे पंकज यांच्या आईनं आपल्या नातवाला फोन करण्यास सांगितलं. चारवेळा फोन करूनही पंकजकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे पंकजचे आई– वडील आणि मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेताच्या दिशेनं गेले. यावेळी चंदननळी ते बिजोरे या रस्त्यावर पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
0 Comments