रवींद्र जडेजाच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताने पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा इनिंग आणि 222 रनने पराभव केला आहे. फॉलो ऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेचा तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 178 रनवर ऑल आऊट झाला. आर.अश्विनने 4 आणि रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला 2 विकेट घेण्यात यश आलं. याचसोबत अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 434 विकेटचा कपिल देव यांचा विक्रमही मोडीत काढला. अश्विन आता टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेनंतर भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे.
दुसऱ्या इनिंगमध्ये श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला याने सर्वाधिक 51 रनची नाबाद खेळी केली. त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेचा फक्त 174 रनवर ऑल आऊट झाला होता त्यामुळे भारताने लंकेला फॉलो ऑन दिला. पहिल्या इनिंगमध्ये जडेजाला 5 विकेट मिळाल्या, तर बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी 2-2 आणि शमीला 1 विकेट घेण्यात यश आलं. पथुम निसांका 61 रनवर नाबाद राहिला होता.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये 574/8 वर इनिंग घोषित केली. रवींद्र जडेजाने नाबाद 175 रनची खेळी केली. याशिवाय अश्विन आणि हनुमा विहारीने अर्धशतकं केली.
रोहित शर्माचा टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवत सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात 175 रनची खेळी केल्यासोबतच संपूर्ण मॅचमध्ये 9 विकेटही घेतल्या. विराट कोहलीचीही ही 100 वी टेस्ट मॅच होती. सीरिजची दुसरी आणि अखेरची टेस्ट आता बँगलोरमध्ये 12 मार्चपासून होणार आहे. ही मॅच डे-नाईट असेल, त्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल.
0 Comments