बार्शी:
नैसर्गिक संकट तसेच बेभरवशाच्या बाजारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यामध्ये आता वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून थेट सबस्टेशन बंद करण्यात येत आहे. हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळे महावितरण विरोधात आक्रमक झालेल्या सौंदरे गावच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उत्तर बार्शी - सोलापूर राज्यमार्ग रोखून धरला. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको करण्याची भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती.
शेतीच्या थकीत वीजबिलासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना तगादा लावला जात असून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. एका बाजूला नैसर्गिक आपत्तीमधून सावरत शेतकऱ्यांनी घेतलेली पिके आत्ताकुठे पैसे मिळवून देण्याची परिस्थिती असताना वीज तोडली जात असल्याने शेतातील उभी पिके जळण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांना शेतमाल विकल्यानंतर बिल भरण्याची मुभा देण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र 10 हजार रुपये भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत होणार नसल्याचं महावितरणने सांगितले आहे. शेतातून उत्पन्न निघालेले नसताना देखील गेल्या 4 महिन्यात सौंदरे गावातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे दोन हप्ते भरलेले आहेत. तरी देखील पुन्हा एकदा बिलासाठी वीज बंद करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांनी सौंदरे गावाजवळ बार्शी - सोलापूर राज्यमार्गावर रास्ता रोको केला. यावेळी महावितरण विरोधात घोषणा देण्यात आल्या.
ददरम्यान, यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
0 Comments