-ओंकार बजागे
तुम्ही कधी लग्नमंडपात वरातीऐवजी कवी, गझलकारांची मैफिल भरलेली पाहिली आहे का ?वरातीऐवजी लोकशाहिरांचा प्रबोधनाचा कार्यक्रम भरलेला पाहिलं,ऐकलं आहे का? नाही ना. पण हे प्रत्यक्ष घडलंय. ही नवप्रबोधनाची सुरुवात म्हणायला हरकत नाही.पण असा विवाह सोहळा संपन्न झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, काहीशा दुर्गम पण निसर्गसौंदर्याने नटलेल्या,शाहूंच्या पदस्पर्शाने पुनीत राधानगरीतील वाकीघोल नावाच्या खेड्यात.
हल्ली लग्न म्हटलं की डॉल्बी, बेंजो, dj हे ओघानेच येते. कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसवणारा त्याचा आवाज म्हणजे सध्याच्या तरुणाईचं प्रेम. त्यावर ठेका धरायचा म्हणजे दारूही ओघाने आलीच. आणि विवाहासारख्या मंगल प्रसंगी तरुणांनी दारू ढोसायची , रात्रभर वरातीत नाचायचं आणि इतरांनी हे ओंगळवाणे दृश्य पाहण्यात धन्यता मानायची. प्रत्येक लग्नामध्ये कमीअधिक फरकाने हेच चित्र दिसतं जवळपास. हे नित्याचेच आणि सवयीचेही. हे असंच चालू आहे आणि अजून बरीच वर्षे चालेलही. पण वाकीघोल सारख्या सह्याद्रीच्या च्या डोंगर कपा-यातून शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेला आणि शाहूंच्या विचारांनी प्रेरित झालेला, त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेऊ इच्छिणारा एक तरुण या परंपरेला फाटा द्यायचा विचार करतो. आणि मग संपन्न होतो एक आगळावेगळा विवाह सोहळा.
या तरुणाचं नाव सुनील गुंडू दळवी.सध्या एसटी महामंडळामध्ये कार्यरत. समाजसेवा ,समाजकार्य हे शब्द फक्त बोलायलाच ठीक दिसतात. प्रत्यक्ष आचरण करणं किती महाकठीण असतं याचे दाखले इतिहासात अनेक सापडतील. पण प्रत्यक्ष कृतीतून स्वतःला सिद्ध करणारी माणसं विरळच. याच यादीत पुढचं नाव घेऊ वाटत ते या तरुणाचं. कोणती आपत्ती येवो वा कुणाचा अपघात, कुणाला रक्ताची गरज असो वा कुणा गरजूला मदत निधीची सगळ्यात पहिल्यांदा यांचच नाव पुढं येत. अगदी सरकारी दवाखान्यातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासली तर रक्तदान शिबिरं घेऊन रक्तदानासाठी तरुणांच मन प्रवृत्त करण्यासाठी फिरत राहणारा हाच माणूस. असा हा शाहूंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून जगणारा माणूस स्वतःच्या विवाहात काही वेगळं करणार नाही तरंच नवल. मग पुढे विचार येतो शाहूंच्या विचारांचा जागर घालण्याचा. आणि मग साकार होतो लोकशाहिरांच्या शाहिरी गीतांच्या माध्यमातून प्रबोधनाचा पण किमान 4 तास तरी लोकांना खिळवून ठेवणारा एक बहारदार कार्यक्रम.
एका दुर्गम अशा खेड्यातील ज्यांच्यासाठी त्यांचं शेत-शिवारच त्यांचं जग अशा ठिकाणच्या जनतेला हे कितपत रुचेल आणि पचेल, वरात रद्द झाल्यामुळे नाराज लोक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतील का?हे आणि असे अनेक प्रश्न मनात होते. पण शिवाजी विद्यापीठातील समविचारी आणि सुनील दळवी यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ देणारे मित्र पुढे येतात आणि सगळ्या कार्यक्रमाची सूत्र हाती घेतात. कुणी उत्कृष्ट वक्ता, कुणी कवी,कुणी गझलकार,चांगला लेखक पण सगळ्यांच्यात एक गोष्ट समान. ती म्हणजे शाहूं-फुले-आंबेडकरांच्या विचार जगणे आणि प्रसार करणे. आणि म्हणूनच एक नवीन संकल्पना जन्म घेते आणि यशस्वीपणे तडीसही जाते.
संध्याकाळची जेवणं पार पाडतात. काहीसे साशंक असणारे लोक अजून कार्यक्रमस्थळी जमलेले नसतात. एक तरुण पुढे येतो आणि माईक घेतो. त्याची लोभासवाणी 'वाणी' लोकांना आकर्षित करू लागते.मग रंगू लागते कवींची मैफिल. एकापेक्षा एक सरस कविता सादर होतात. लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. गर्दी जमते. कार्यक्रमासाठी जबरदस्त पार्श्वभूमी तयार होते. आणि मग सुरू होतो याच मित्रपरिवरातील घटक असलेल्या शाहीर रणजित कांबळे यांचा लोकशाहिरीचा कार्यक्रम. अफाट प्रतिभा असलेला हा शाहीर. आवाज, समयसूचकता, विनोद, उत्कृष्ट वक्ता या सगळ्याचा संगम.आपल्या कौशल्याने 3 तास हा तरुण लोकांना खिळवून ठेवतो. हे संपूच नये अशी श्रोत्यांची भावना तयार होते. अणि तिथंच या नवीन केलेल्या 'धाडसा'च्या यशस्वीतेची पोहोच मिळते. या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलेला प्रत्येक घटक 'याचसाठी केला होता अट्टाहास' असे म्हणत आतल्या आत आनंदून जातो.
एक आगळावेगळा आणि नवप्रबोधनाची सुरवात ठरू पाहणारा हा विवाह सोहळा संपन्न होतो.
0 Comments