पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली म्हणजे लोकप्रिय दाक्षिणात्य स्टार रश्मिका मंदाना तिच्या क्यूटनेसने सर्वांनाच घायाळ करते. मनमोहक अदा अन् गोड हास्यामुळे लाखो लोक तिचे चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबत तिची हटके स्टाइलही चाहत्यांना खूप आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का की सुंदर दिसणारी श्रीवल्ली तिच्या घरच्यांसमोर खूप हट्टी आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने तिच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.
लहान वयातच रश्मिकाने कलाक्षेत्रात पदर्पण केलं. ती तिचं काम खूप निष्ठेने करते. रश्मिका जेव्हा काम करते तेव्हा स्वतःच्या आणि तिच्या कामाच्यामध्ये कोणालाच येऊ देत नाही. बाहेरचे तर सोडाच पण आई- वडिलांनाही ती मध्यस्ती करू देत नाही. याबाबत खुद्द रश्मिकाने खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्यान रश्मिकाने सांगितलं की, कोविड काळात जेव्हा रश्मिका शूट करण्यासाठी घराबाहेर पडायची तेव्हा तिच्या घरच्यांना खूप भीती वाटायची. पण रश्मिका तिच्या कामाबद्दल किती हट्टी आहे हे तिच्या घरच्यांना माहिती आहे. त्यामुळेच घरच्यांनीही तिला याबद्दल कधी काही सांगितलं नाही.
रश्मिका म्हणाली,’माझे घरचे सगळं काही बघत होते. मी शूटिंगसाठी सेटवर जाते, मला मास्क काढावा लागतो. ते माझं काम आहे. मी माझ्या कामामध्ये कोणाला बोलू देत नाही. माझ्या पालकांना माहिती आहे की मी त्यांचं ऐकणार नाही. जर त्यांनी मला चित्रीकरणाला जाऊ नको किंवा वातावरण सुरक्षित नाही असं सांगितलं असतं, तरी मी त्यांचं ऐकणार नाही. मला वाटत की मी माझं काम पूर्ण केलं पाहिजे, कारण एका चित्रपटापाठी खूप मेहनत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.’
‘पुष्पा द राइज’ चित्रपटात रश्मिका आणि अल्लू अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपटातली गाणी, डायलॉग आणि कलाकारांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ मध्ये काम करणार आहे.
0 Comments