अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी ३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेप



गुजरातमधील अहमदाबाद येथे २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच इतर ११ जणांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा केली.

बॉम्बस्फोटातील मृताच्या वारसांना एक लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अहमदाबादमधील मणिनगरमध्ये २६ जुलै २००८ रोजी संध्याकाळी पावणेसात वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. नंतर ७० मिनिटांत आणखी २० बॉम्बस्फोट झाले. त्यात ५६ जणांचा मृत्यू, तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. २००२ मधील गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी 'इंडियन मुजाहिद्दीन'ने हे बॉम्बस्फोट घडविले होते.

दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला ७८ आरोपी होते. नंतर एक आरोपी सरकारी साक्षीदार झाला. अहमदाबादच्या विशेष न्यायालयात तब्बल १३ वर्षे हा खटला चालला. विशेष न्यायालयाने ८ फेब्रुवारी रोजी ४९ आरोपींना दोषी ठरवलं, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली.

Post a Comment

0 Comments