श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र सुरूवारकरी भाविकांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा



पंढरपूर/प्रतिनिधी:

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहिर केलेल्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असणारे  विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र पूर्ववत सुरू करण्यात आले असून, वारकरी व भाविकांनी अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे, आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना महाप्रसाद मिळावा या हेतूने संत तुकाराम भवन येथे अन्नछत्र चालवले जाते. सदरचे अन्नछत्र सन 1996 पासून भाविकांच्या सेवेत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासन निर्बंध शिथील  केले आहेत. शासन आदेशान्वये  राज्यातील सर्व मंदिरे दि.07 ऑक्टोबर 2021 पासून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर इतर सर्व देवस्थामध्ध्येही अन्नछत्रालय सुरू केलेली आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे देखील अन्नछत्र सुरू करावे अशी भाविकांकडून मागणी होत होती.भाविकांची मागणी विचारात घेऊन, मंदिर समितीने  श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र दि.19फेब्रुवारी  2022 पासून पूर्ववत सुरु करण्याचा नुकताच 13 फेब्रुवारीच्या मंदिर समितीच्या बैठकीत  निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून आज (शनिवार)  दिनांक 19 फेब्रुवारी, 2022 पासून पूर्ववत सुरु करण्यात आले असल्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.
           
या अन्नछत्रात दररोज दुपारी 12 ते 2 या कालावधीत मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येते त्याचा  दैनंदिन 1200 ते 1500 भाविक लाभ घेतात. या अन्नछत्रासाठी मंदिर समितीची अन्नछत्र वाढदिवस ही योजना असून, या योजनेत किमान रू.25 हजार रुपयांपासून पूढे रक्कम देणगी स्वरूपात जमा करून, इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येणार आहे. तसेच भाविकांना अन्नधान्य व किराणा माल स्वरूपात देखील देणगी जमा करता येईल. इच्छुक भाविकांनी अन्नछत्र देणगीत सहभाग नोंदवावा असे, आवाहन मंदीर समितीच्या वतीने करण्यात  आले आहे.

या कार्यक्रमावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, श्रीमती शकुंतला नडगिरे,  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रम कदम, तहसिलदार श्री सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी श्री अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, अन्नछत्र विभाग प्रमुख श्री बलभिम पावले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments