मुंबई :
आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत एका मित्राने दुसऱ्या मित्राला चालत्या रेल्वेसमोर फेकून दिल्याची घटना घडली आहे. बोरिवली जीआरपी पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. गणेश नरसिंग मुखिया असे यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बोरिवली ते कांदिवली दरम्यान पोईसर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला, मृतदेहावर काही जखमा होत्या, जखमा पाहून पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला. लगेच पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृत हा बोरिवली ते कांदिवली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी भागातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांनी सांगितले की, गणेश नरसिंग मुखिया असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याचे वय २२ वर्षे आहे, तो मधुबनी बिहारचा रहिवासी आहे. याप्रकरणी आरोपी मित्राची चौकशी केली असता तो म्हणाला की, महिनाभरापूर्वी गणेश मुंबईत येऊन आमच्याकडे राहायचा आणि फ्रँकीचा व्यवसाय करत होता. मृत गणेश हा माझ्या आईशी वारंवार फोनवर बोलत होता. त्यामुळे आरोपीला असे वाटले की, मृताचे त्याच्या आईसोबत अनैतिक संबंध आहेत. घटनेच्या रात्री आरोपीने मृत मित्राला रेल्वे रुळावर नेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीसमोर ढकलून त्याची हत्या केली. बोरिवली जीआरपी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी अशोक मुखिया याला अटक करून या हत्येचे गूढ उकलले.
0 Comments