सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात कोणता अलिखित करार झाला होता हे मला माहिती नाही.
सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातही मी काम केले आहे. त्यांचा आदर ठेवून आम्ही सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) वाढवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे एकेकाळचे समर्थक असलेले शिवसेना नगरसेवक महेश कोठे व एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्या नातेवाइकांचा व समर्थकांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर शहरामध्ये विविध जातीचे व विविध धर्माचे लोक राहात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून सोलापूरला भेडसावणारे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील का? त्यासाठी बैठका व भेटीगाठी सुरू झाल्या आहेत का? संदर्भात विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, सध्या आमच्यासमोर राष्ट्रपती पदाच्या निवडीचा कोणताही विषय नाही. यासंदर्भात फक्त वावड्या उठविल्या जात आहेत. तुमचा गैरसमज नको. शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबद्दल वावड्या उठविल्या जात असल्याची माहितीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
देशातील बॅंकांवर पूर्वी नाबार्डचे नियंत्रण होते. नंतर आरबीआयचे नियंत्रण आले. आता या बॅंकांवर आणखीन नवीन नियंत्रण आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. देशातील बॅंकिंग क्षेत्राचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत, अशी माहितीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या इशाऱ्यावर चालते ईडी, सीबीआय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्यावर व सांगण्यावर ईडी व सीबीआय काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. देशातील ज्या राज्यात भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे, त्या ठिकाणचे सरकार पाडण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
0 Comments