पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते सात वाजता विठ्ठलाचे मुखदर्शन मिळणार


पंढरपूर/प्रतिनिधी:

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुख दर्शनासाठी स्थानिक नागरिकांना ऑनलाईन बुकींग पासची अट रद्द करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणे सकाळी सहा ते सात या वेळात पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना ऑनलाईन बुकिंग न करता प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

(Advertise)

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात ऑनलाइन दर्शनाचे बुकींग करून आलेल्या भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. सुरुवातीस एक हजार भाविकांना दिवसभरात मुखदर्शनासाठी सोडले जात होते. पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना दिपावलीच्या काळात एक दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून दिले होते. तसेच ऑनलाईन बुकींग पास घेण्याची अट ही एक दिवसासाठी रद्द करण्यात आली होती.

(Advertise)

पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना ५ डिसेंबरपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दररोज सकाळी सहा ते सात या वेळात मंदिरात मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांना स्थानिक नागरिक असल्याविषयी आधार कार्ड अथवा मतदान कार्ड दाखवावे लागणार आहे.

 पंढरपूरचा रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा आवश्यक असणार आहे. तसेच त्यांना कासार घाट येथील दर्शन रांगेतून प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षापूढील व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments