वेश्या व्यवसाय करणे हा कायद्यानुसार गुन्हा नाही, तसेच प्रत्येक व्यक्तीला त्यांचा व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं वेश्या व्यवसाय करणाऱ्या तिनही महिलांना दिलासा दिला आहे. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायद्याचा मूळ उद्देश हा वेश्या व्यवसायाचं निर्मुलन करणं किंवा या व्यवसायातील महिलांना शिक्षा करणं हा नाही. कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. व्यावसायिक हूतेनं एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीनं या व्यवसायात आणणं हा शिक्षेस पात्र गुन्हा असल्याचं यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईच्या मालाड परिसरातील चिंचोली बंदर येथून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची मुंबई पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर २०, २२ आणि २३ वर्षीय मुलींना मुंबई दंडाधिकारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने या मुलींची रवानगी महिला वसतिगृहात केली व प्रोबेशन ऑफिसर कडून त्यांनी याबाबत रितसर अहवाल मागवला. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या महिलांचा ताबा त्यांच्या पालकांना देण्यास नकार दिला व या महिलांना उत्तर प्रदेश येथील महिला वसतिगृहात ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान प्रोबेशन अधिकाऱ्याने यासंदर्भात अहवाल सादर केला.
0 Comments