स्वतः विमान तयार करणारा "दे धक्का" मधील मकरंद सारखा रिअल लाईफमधल्या अशाच एका मॅकॅनिकला "लोकवार्ता"वर घेवून आलो आहे..

शानदार, जिंदाबाद, जबरदस्त ! कॅप्टन अमोल यादव यांची गगनभरारी त्यांचा प्रवास....

✍️ऋषिकेश नळगुणे

मकरंद सुर्यभान जाधव आठवतोय? तोच, बापाची सहा एकर जमिन फुकून खालेल्ली न् पट्टनकोडोलीच्या गोठ्यात यशस्वीपणे गाडीचा आंतरराष्ट्रीय पार्ट तयार 0केलेला, तोच, 'दे धक्का' मध्ये रिल लाईफ मधला हा मॅकॅनिक. पण आज आम्ही तुमच्या माहितीसाठी रिअल लाईफमधल्या अशाच एका मॅकॅनिकला "लोकवार्ता"वर घेवून आलो आहे. तो मॅकॅनिक आहे पण विमानाचा! आणि त्यानं विमानाचा पार्ट नाही तर अख्खं विमानच तयार केलं आहे. त्यासाठी आयुष्यातील तब्बल अठरा वर्ष आणि पाच कोटी रुपये पणाला लावून. यासाठी मालमत्तेपासून दागिन्यापर्यंत सगळं विकून झालं आहे. 

१८९५ ला शिवकर बापुजी तळपदे यांनी गिरगांव चौपाटीवर स्वतः बनविलेलं विमान उडवलं न् इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहीलं होतं. त्यानंतर बरोबर १२४ वर्षांनी दुसरा वैमानिक आपण स्वतःच बनविलेलं विमान उडवण्यास सज्ज झाला. तो ही मराठीच आणि ते ही मुंबईतच! हा दुर्मिळ योगायोग घडवून आणला मुंबईच्या कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांनी. 

अमोल यादव हे दोन इंजिनवाल्या टर्बोप्रॉप विमानाचे वैमानिक आहेत. बारावी झाल्यानंतर १९९५ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेला कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी जायचं ठरवलं. पण अमेरिकेला जायचं तर पैसे लागणार. त्यासाठी त्यांनी घर गहाण ठेवून पैश्यांची तजबीज केली न् अमेरिकाला रवाना झाले. तिकडे गेल्यावर आणखी पैसे लागणार होते म्हणून काकांनी आपले रिटायर्टमेंटचे पैसे पाठवून दिले. १९९८ ला ट्रेनिंग पुर्ण करुन भारतात परत आले. आल्यानंतर ते विमान बनविण्याचं स्वप्न पुर्ण करण्याच्या मागे लागले. 

त्याच वर्षी त्यांनी आठ सिलेंडरचं पेट्रोल इंजिन आणि विमान विषयक 50 जुनी पुस्तकं खरेदी केली. ती वाचून विमानाचं काम सुरू केलं. एका वर्षांत २ आसनी विमान तयार केलं आणि त्याची चाचणीही घेतली. पण काही तांत्रिक कारणांनी ती पुर्णपणे अयशस्वी झाली. 

१९९९ मध्ये अमोल यांनी पुन्हा उठून उभं राहत सगळी तांत्रिक काळजी घेतली न् चार वर्षात पुन्हा २ आसनी विमान बनवलं. २००४ मध्ये त्यांनी दिल्लीत काही मंत्र्यांची भेट घेतली. हवाई वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही चाचणी घेण्याची विनंती केली. पण अधिकाऱ्यांनी "हे विमान उडू शकणार नाही, उडालं तरी क्षणात कोसळेल," असं सांगत उडण्याआधीच विमानाचे पंख छाटले. विमान पण पडून राहिलं. पुढे चोरट्यांनी त्याचे काही भागही चोरुन नेले. 

हार न मानता त्यांनी पण सहा वर्षांनी पु्न्हा विमान बनवण्यास सुरुवात केली. यंदा हे काम TAC-००३ या प्रकारातील ६ आसनी विमान तयार करण्याचं होतं. २०१० ची म्हणजे दहा वर्षांपूर्वीची आहे. अमोल यादव यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या गच्चीवर विमान बांधण्याचा विचार घरच्यांना आणि मित्रमंडळींना बोलून दाखवला. विकत किंवा भाड्याने जागा घेवून तिथं विमान बनवायच एवढे पैसे नसल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला. 

आणि मग सुरु झालं १२०० चौ. फूट जागेत ताडपत्रीच्या शेडखाली कडक उन्हात, गोठवणाऱ्या थंडीत आणि मुंबईच्या मुसळधार पावसात विमान बनविण्याच काम. त्यासाठी त्यांनी गॅरेजमधील एक मेकॅनिक, एक फॅब्रिकेटर या त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सोबत घेतलं. 

अमोल सांगतात... 'जागा जरी छोटी असली तरी माझे प्रयत्न आणि इच्छाशक्ती त्याहुन कैकपटीने होती. 

पाच मजली बिल्डिंगमध्ये १९ जणांचं यादव कुटुंब एकत्र राहतं. या बिल्डिंगला लिफ्ट नाही. त्यामुळे लेथ मशीन, कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशीन आणि १८० किलो वजनाचं आयात केलेलं इंजिन, हे सगळं त्या बिल्डींगच्या छोट्याश्या जिन्यातुन गच्चीवर नेण्यात आलं. फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेर हे ६ आसनी विमान तयार झालं. 

या विमानाच्या इंजिनची १३ हजार फुटांपर्यंत विमान घेऊन जाण्याची क्षमता आहे. तसेच एकावेळी २ हजार किमींचं अंतर जाण्याइतकं इंधन यात राहू शकतं, तर प्रति तास ३४२ किमीचा प्रवास या विमानानं करता येईल. अमोल यादव यांच्या मते, अशाप्रकारे घरात बनवण्यात आलेलं हे पहिलं भारतीय विमान आहे. 

२०१६ मध्ये वांद्रे-कुर्ला कॉंप्लेक्समध्यै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेसाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या प्रदर्शनात हे विभान त्यांना ठेवायचं होतं. पण तयार झालेलं विमान आता खाली उतरवणं, हे एक मोठं दिव्य होतं. 

यासाठी विमानाचे भाग वेगवेगळे करून ते खाली उतरवण्यात आलं. इंजिन, पंख, शेपटी आणि इंधन टाकी हे सगळं वेगळं करण्यात आलं. एका क्रेनच्या मदतीनं विमान खाली घेण्यास सुरुवात झाली. मध्यरात्रीच ट्रकमध्ये सगळे भाग नीट ठेवून घरापासून २५  किमींवर असलेल्या प्रदर्शनाच्या मैदानात नेण्यात आले

तिथं गेल्यावर पण बरीच धडपड करावी लागली. सुरुवातीला आयोजकांनी विमान ठेवण्यासाठी जागा नसल्याचं कारण देत त्यांना परवानगी नाकारली. पण यादव यांनी मैदानाच्या आसपासची जागा शोधू्न काढली. सुरक्षारक्षकांना विनंती केली, मग त्यांना आत येऊ दिलं, पुढील तीन तासांत विमान बांधण्यात आलं.

विमान तयार पण उड्डानाची परवानगी नव्हती

२०१६-१७ या दोन वर्षाच्या कालवधीत विमान तयार होवून उभं होतं. वेळोवेळी वेगवेगळ्या एअर शो मध्येही पाठवण्यात येत होतं. पण उड्डानासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून ‘उड्डाणाचा परवाना’ मिळत नव्हता. तो मिळवा यासाठी ते प्रयत्न करत होते. प्रसारमाध्यमांनीही हा विषय उचलला. पण महाराष्ट्र सरकार, स्थानिक खासदार यांनी पाठपुरावा करूनही हवाई वाहतूक नियामक प्राधिकरणानं गच्चीवर बांधण्यात आलेल्या या विमानाची नोंदणी केलेली नाही.

यादव सांगतात "सतत नियम बदलत राहतात. त्यामुळे मी कंटाळलो आहे, प्राधिकरण म्हणतं की, हवाई वाहतूक यंत्रणेनं अशा प्रकारच्या विमानांसाठी नियमावली तयार केलेली नाही. भारतात सर्वसामान्यांनी केलेल्या संशोधनाकडे आजही गांभीर्यानं पाहिलं जात नाही. मला हे विमान उडवण्याची परवानगी मिळाली तर मी भारताचा हवाई इतिहास घडवीन," 

अखेरीस परवाना मिळाला आणि शासनानं दखलं ही घेतली : 

अखेरीस मागील वर्षी कॅप्टन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली न् त्यांच्या मध्यस्थीनं तीन-चार दिवसातचं परवाना मिळाला आहे. तसेच अशाप्रकारच्या विमानाचं व्यावसायिक उत्पादन करण्यास आपण तयार असून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. 

तसेच राज्य सरकारनंसी त्यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट प्रा. ली. या कंपनीबरोबर मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा देशांतर्गत विमान निर्मितीबाबतचा सामंजस्य करार केला आहे. त्यांना १५७ एकर जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तिथं १९ आसनी विमान बनवण्याचा कारखाना यादव उभा करणार आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढेल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील.

Post a Comment

0 Comments