देशांतील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच गोष्टीची दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने यासंदर्भात कठोर भूमिका घेत आदेश दिला आहे की कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर निघताना मास्क न घालता दिसली तर तिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. उत्तर प्रदेशमधील क्वारंटाइन सेंटर्सची परिस्थिती आणि कोविड १९ रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला.
न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायामूर्ती अजित कुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात बोलताना कोणत्याही नागरिकाने मास्क न घालता घराबाहेर पडू नये असं म्हटलं आहे. जर कोणी मास्क घालत नसेल तर तो संपूर्ण समाजाचा गुन्हेगार आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रत्येक पोलीस स्थानकातील पोलिसांच्या टास्क फोर्सने मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. घरीच आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांनाही आरोग्य सुविधा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.
0 Comments