भीमा नदी दुथडी ; जुना दगडी पूल पाण्याखाली : भीमा नदी काठच्या गावाला सतर्कतेचा इशारा



पंढरपूर/प्रतिनिधी:

उजनी धरण परिसरात व व भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांनी दिली.

 उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी ३० हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर नीरा नदीतूनही भीमा नदीत पाणी मिसळत आहे. भीमा नदी परिसरात दमदार पाऊस झाला असल्याने भीमा नदीची पातळी वाढू लागली असून पंढरपूर येथे भीमा नदी ६३ हजार ५०० क्युसेकने वाहत असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण परिसरात दमदार पाऊस झाला असल्याने उजनी धरणातून सोळा दरवाजे ०.५३ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ३० हजार क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत आहे.

 नीरा नदीतूनही भीमा नदीत पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यात भर म्हणून गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर, सांगोला, माळशिरस भागात अतिवृष्टी झाली असल्याने कासाळ ओढा तसेच इतर लहान-मोठे ओढे भरुन वाहात आहेत. या ओढ्यांचे पाणीदेखील भीमा नदीत मिसळत आहे. यामुळे पंढरपूर येथे भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून ६३ हजार ५०० क्युसेकने पाणी वाहात आहे. यामुळे दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. चंद्रभागेच्या घाटांच्या पायर्‍या पाण्याखाली गेल्या आहेत. येथील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली बुडू लागली आहेत. दगडी पुलाशेजारील बंधारादेखील पाण्याखाली गेला आहे. आणखी भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भीमा नदीवरील मुंढेवाडी ते अजनसोंड यादरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असल्याने या बंधार्‍यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमा नदीकाठच्या सखल भागातील ओढ्यांव्दारे पाणी मागे सरकू लागले असल्याने ऊस पिके पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली असल्याने प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments