पंढरपूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहक तसेच शेतकऱ्यांची शेतीपंपाची बिले व लघू उद्योजकांची बिले आघाडी सरकारने माफ करावीत अन्यथा भाजपच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला आहे.
भाजपच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकार्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, रुद्रेश बोरामणी, प्रकाश घोडके, ऋषिकेश ढेरे, शुभम मिसाळ, प्रीतम ठोंबरे, अक्षय सलगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी करण्यात आली. या काळात सर्व व्यवहार, बाजारपेठा, रोजगार ठप्प असल्याने शेतकर्यांसह सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका शेतीला व लहान व्यावसायिक, कामगार, मजूर यांना बसला आहे. लहान-मोठी दुकाने, शेतीपूरक उद्योग, बांधकाम यासह संपूर्ण बाजारपेठ ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे.
३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज स्वस्त करण्यात यावी. राज्य सरकारचा १६ टक्के अधिभार आणि वहन कर रद्द करावा. वीज उत्पादन कंपन्याचे ऑडिट करण्यात यावे. ज्या वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळात प्रामाणिकपणे घरगुती व शेतीपंपाची वीज बिले भरली आहेत. अशा ग्राहकांना पुढील तीन महिन्यांची वीज बिलाची आकारणी करू नये. कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतीपंपाची, घरगुती, व्यापारी, लघू उद्योजक यांची लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0 Comments