राकेश करमळकर/आजरा;
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मौजे जेऊर व चितळे येथील गायरान जमिनी देण्यास चितळे, जेऊर,भावेवाडी व धनगरवाडा येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शासन व प्रशासनाने देशाचा कणा ही देशातील स्वावलंबी खेडी हे मान्य केले होते व त्यांच्या भविष्यकालीन सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टींच्या तरतुदी केल्या होत्या त्यापैकी एक गाव व त्याचे गायरान. गावातील लोकांना या गायरानामध्ये आपल्याकडील जनावरे चारण्यासाठी याचा उपयोग होत होता. पशुधना मधून ग्रामस्थांना आर्थिक उत्पन्नाची संधीही मिळत होती. कालांतराने या वाड्यावर त्यांचे रूपांतर खेड्यात व मोठ्या गावात होऊ लागले आकारमानाने वाढलेल्या गावांना होऊ घातलेल्या विकासाच्या अनेक योजनांसाठी येथील जमिनी उपलब्ध करून दिल्या गेल्या. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी या गायरानातील जमिनी काढून घेतल्या तर भविष्यामध्ये गावकऱ्यांची कुचंबणा होऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चितळे, भावेवाडी, धनगरवाडा, कामतवस्ती व जेऊर येथील ग्रामस्थांना विश्वासात न घेता गायरान जमिनी संपादित केल्या म्हणून ग्रामस्थांनी निषेध केला आहे. रविवार दि १३ रोजी येथील ग्रामस्थ चुलबंद आंदोलन करत आहेत.
भौगोलिक परिस्थिती समजून न घेता शासनाने केलेल्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर सरपंच मारुती चव्हाण, उपसरपंच प्रकाश तर्डेकर, बाळासो तर्डेकर, जयवंत सरदेसाई, संजय सांबरेकर, पांडुरंग धनुकटेकर, कृष्णा कुरुळकर, अशोक तर्डेकर, बाळू पोवार, विठोबा कस्तुरे, विठोबा येडगे, वमा थोरवत आधी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
0 Comments