सोलापूर : राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र ऑगस्ट २०२० साठी प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून आयटीआयमध्ये असलेल्या एक लाख ४५ हजार ९६८ उपलब्ध जागांसाठी तब्बल २४ लाख ६८ हजार २६१ उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरून विकल्प सादर केले आहेत. तसेच पुणे विभागातील ३० हजार ६९६ जागांसाठी तीन लाख ३१ हजार ८६० तर सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार २८० जागांसाठी ६७ हजार ९१७ विकल्प अर्ज सादर करण्यात आले आहेत.
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश वेळापत्रकानुसार ३ सप्टेंबर रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीतील हरकती व माहितीतील बदल उमेदवारांना ३ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरपर्यंत करता येणार आहेत. ५ सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तर ९ सप्टेंबरच्या सकाळी नऊपासून पहिल्या प्रवेश फेरीस सुरवात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती:
सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय शासकीय व खासगी आयटीआयमधील उपलब्ध जागा व प्रवेशासाठी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांची संख्या : उत्तर सोलापूर : २०२४-२८९३२, दक्षिण सोलापूर : १५२-२४१०, माळशिरस : ६८८-४३९१, अक्कलकोट : १८०-२६४०, पंढरपूर : ५८८-८२७९, बार्शी : ७०४-९६४६, करमाळा : १२४-२२४४, माढा : २१२-१८९३, सांगोला : ८०-४७९, मंगळवेढा : ३७६-३९७४, मोहोळ : १५२-३०२९.
0 Comments