माणुसकी ठेवा; नुसत्या नोटा छापू नका: ना. हसन मुश्रीफ



खासगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ  यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता समाजाची सेवाही करा, असेही ते म्हणाले

नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांच्या संयुक्‍त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. 

कागलमधील कोरोनामुक्‍त हिंदुराव परसू पसारे (वय ७५) व त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना  (वय ७०) यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सेवाभावी पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले व एकमेव कोव्हिड हॉस्पिटल आहे. ११२ बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व व्हेंटिलेटर  या सुविधाही आहेत.  

'माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ हे दोन टप्प्यांतील अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरांत ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर आदी उपस्थित होते. 

समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधनसामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोव्हिड सेंटर सुरू करावे. जनसेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. 

Post a Comment

0 Comments