पीपीई किट थेट रस्त्यावर ; विल्हेवाट करण्याची जबाबदारी रुग्णाच्या खांद्यावर

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना आता एका वेगळ्याच समस्येने बाळसे धरल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणारे पीपीई किटची विल्हेवाट नीट करणे आवश्यक असताना काही रुग्णालये व डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून कमालीचा बेजबाबदारपणा सुरू आहे.यामुळेच वैद्यकीय कचरा उघड्यावर येऊन इतर निरोगी नागरिकांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.  

कोरोना बाधित रुग्णांच्या फुफुसास किती टक्के कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर छातीच्या सिटी स्कॅनचा सल्ला देतात. अशावेळी शहरातील काही नामवंत डायग्नोस्टिक सेंटर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे दोन्ही रुग्ण या सिटी स्कॅन साठी हजेरी लावतात. यातील काही सिटी स्कॅन सेंटर कडून खबरदारी म्हणून रुग्णास पीपीई किट दिले जाते. यामागचा उद्देश हाच की या सेंटर मध्ये इतर आजारासाठी स्कॅन करण्यासाठी येणाऱ्या रुग्णास कोरोनाचा संसर्ग होऊ नये. एकप्रकारे हे अभिनंदनीय अशीच खबरदारी म्हणावी लागेल.

मात्र स्कॅन झाल्यानंतर हे पीपीई किट त्या रुग्णाकडे सुपूर्द केले जाते आणि त्याची विल्हेवाट लावण्यास सांगितले जाते. बऱ्याचदा अगोदरच रुग्ण भांबावून गेलेला असतो.अशात ही नवी जबाबदारी अंगावर येऊन पडल्यामुळे तो घाबरून जातो. व याच मनःस्थितीत त्याच्याकडून किंवा त्याच्या नातेवाईकांकडून हे पीपीई किट रस्ता, ओढे, नदी याठिकाणी उघड्यावर टाकला जातो.

असा उघड्यावरील वैद्यकीय कचरा इतर निरोगी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. याबद्दल आरोग्य विभागाने अशा डायग्नोस्टिक सेंटर यांना कडक शब्दात समज देऊन हा प्रकार रोखणे आवश्यक आहे.तसेच सदर पीपीई किट हे स्वतःकडे एकत्रित करून योग्य वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कंपनीकडे सुपूर्द करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्ह्यात अशा प्रकारे संसर्ग वाढून कोरोनाचा आकडा वाढतच राहील. 

● कडक कारवाईची गरज

एकीकडे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईक हतबल झालेले असतात. अशात पीपीई किटची नीट विल्हेवाट लावणे काही कारणामुळे शक्य नसल्याने असा वैद्यकीय कचरा रस्त्याकडेला पडतो. यासाठी खऱ्या अर्थाने रुग्ण जबाबदार नसून त्यांना हे पीपीई किट विल्हेवाट लावण्यासाठी देणारे डायग्नोस्टिक सेंटर जबाबदार आहेत. या सर्व केंद्रावर योग्य ती कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments