स्टेअरिंग हातात घेतलेले अजित पवार म्हणतात, उद्धवजी 'हॅपी बर्थडे

'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या ट्विटरमार्फत शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोन ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. पण, या शुभेच्छा देताना अजित पवारांनी ज्या फोटोची निवड केली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ( दि.२७) ६१ वा वाढदिवस आहे. जरी महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांना तसेच कार्यकर्त्यांना यंदाचा वाढदिवस मोठ्याने साजरा करता येणार नाही. असे असले तरी ६१ व्या वाढदिनी ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत हे विशेष आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. 

पण, या सर्वांमध्ये सर्वात लक्षवेधी शुभेच्छा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यांनी मराठीतून दोन तर इंग्रजीतून एक ट्विट केले आहेत. त्यांनी पहिले ट्विट इंग्रजीतून केले त्यानंतर दुसरे ट्विट हे पहिल्या ट्विटचे मराठी भाषांतर आहे. पण, या पहिल्या ट्विटला त्यांनी ज्या फोटोची जोड दिली आहे. त्यातून त्यांना महत्वाचे राजकीय भाष्य करायचे आहे का असे संकेत मिळत आहे. कारण या फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीत बसले आहेत. पण, त्यात ड्रायव्हर सीटवर अजित पवार बसले आहेत आणि शेजारील सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले आहेत. 

सामान्य परिस्थिती यात विशेष असे काही नाही. पण, आदल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून विरोधकांच्या तीन चाकी सरकार या टिकेला प्रत्युत्तर देताना हे तीन चाकी सरकार म्हणजे गरीबांची रिक्षा आहे आणि त्याचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी गाडीचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचा फोटो टाकून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या शुभेच्छा आणि त्यासाठी निवडलेला फोटो यावरुन जोरदार राजकीय चर्चा सुरु झाली आहे. 

अजित पवारांनी महाआघाडीच्या चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भल्या पहाटे राजभवनावर घेतलेल्या शपथीची प्रसंग अजून महाराष्ट्राच्या स्मृतीपटलावरुन गेलेला नाही. त्यातच आता 'स्टेअरिंग'च्या कंट्रोलवरील अद्रुष्य दावा प्रतिदाव्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा सुरु आहे.

Post a Comment

0 Comments