बार्शी :
मतदार यादीतील दुबार मतदाराच्या नावावर हरकत का घेतली, असा जाब विचारत एका तरुणाला लाकडी काठी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना पिंपळवाडी (ता. बार्शी) येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रविण बापू चौधरी (वय ३१, रा. पिंपळवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रविण चौधरी यांचे येरमाळा येथे हायवेअर पेंटचे दुकान असून ते शेतीही करतात. दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते मोटारसायकलवरून बार्शीकडे जात होते. यावेळी पिंपळवाडी येथील बसस्थानकाजवळ बाजीराव शिवाजी चौधरी याने त्यांना अडवले.
'तुझ्या भावाने चंद्रकांत याने मतदार यादीतील दुबार मतदाराच्या नावावर हरकत का घेतली?' असा जाब विचारत बाजीराव याने हातातील लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. त्यानंतर राजकुमार अनुबा चौधरी याने लोखंडी गजाने हातावर व पाठीवर मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच अच्युतराव अनुबा चौधरी, बाजीराव यांची पत्नी व आई देवई शिवाजी चौधरी आणि अच्युतराव यांची पत्नी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
'तुझा भाऊ चंद्रकांत कुठे आहे, त्यालाही बघून घेतो,' अशी धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. आरडाओरडा ऐकून गावातील इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवले. या प्रकरणी बाजीराव शिवाजी चौधरी, राजकुमार अनुबा चौधरी, अच्युतराव अनुबा चौधरी, बाजीराव यांची पत्नी, आई देवई शिवाजी चौधरी आणि अच्युतराव यांची पत्नी अशा सहा जणांविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या उपचार पत्रानुसार फिर्यादीने ग्रामीण रुग्णालय, पांगरी येथे उपचार घेतल्यानंतर पोलिसांत जबाब नोंदवला.
0 Comments