भारतीय महिला संघाची नवी पूर्णवेळ कर्णधार स्मृती मानधना हिच्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका खास ठरू शकते. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात मैदानात उतरताना तिच्यासमोर एका ऐतिहासिक विक्रमाची संधी आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण करणारी पहिली क्रिकेटपटू होण्यापासून ती काहीशी दूर आहे.
१३३ धावांची गरज!
मानधनाने आतापर्यंत १७९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १७२ डावांत तिच्या नावावर ४,८६७ धावा आहेत. यामध्ये दोन शतकं आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. ५ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी तिला आणखी १३३ धावांची गरज आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तिची बॅट तळपली, तर हा विक्रम तिच्या नावावर होऊ शकतो.
पुरुष क्रिकेटमध्येही कोणी गाठला नाही हा टप्पा
पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम ४,५९६ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जोस बटलर ४,३८४ धावांसह दुसऱ्या, तर रोहित शर्मा ४,२३१ आणि विराट कोहली ४,१८८ धावांसह पुढे आहेत. मानधना ५ हजार धावांचा टप्पा पार केल्यास महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरेल.
हरमनप्रीतनंतर मानधनाकडे नेतृत्व
हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने ३० वर्षीय स्मृती मानधनाची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मानधनाने आतापर्यंत ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता नव्या जबाबदारीच्या सुरुवातीलाच विक्रम करण्याची संधी तिच्यासमोर आहे.
झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघ
स्मृती मानधना (कर्णधार), हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, शेफाली वर्मा, ऋचा घोष, नंदनी शर्मा, अनुष्का शर्मा, क्रांती गौड, मोनी कलिता, श्री चरणी, निकी प्रसाद, कमलिनी आणि प्रेमा रावत यांचा भारतीय संघात समावेश आहे. रायपूरच्या मैदानावर मानधना कर्णधार म्हणून कशी सुरुवात करते आणि विक्रमाला गवसणी घालते का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
0 Comments