धाराशिव : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुलींसाठी शिक्षणाचा प्रवास अनेकदा अडथळ्यांनी भरलेला असतो. आर्थिक मर्यादा, सामाजिक बंधने आणि संधींची कमतरता यामुळे अनेक स्वप्ने अर्ध्यावरच थांबतात. मात्र जिद्द, कष्ट आणि कुटुंबाचा भक्कम आधार असेल तर अशक्य वाटणारी स्वप्नेही सत्यात उतरू शकतात. देवसिंगा नळ ता.तुळजापूर जि.धाराशिव शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सुलताना पठाण यांची वाटचाल ही अशाच संघर्षातून घडलेली प्रेरणादायी कहाणी आहे. एनसीसीमध्ये लेफ्टनंट रॅंक मिळवून सध्या पीएचडी संपादित केली आहे.
ग्रामीण वातावरणात वाढलेल्या सुलताना पठाण यांचे बालपण साध्या परिस्थितीत गेले. कुटुंबाचा मुख्य आधार शेती. मोठ्या शहरांतील आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसतानाही शिक्षणाबद्दलची त्यांची ओढ लहानपणापासूनच प्रबळ होती. मर्यादित साधने, सामाजिक बंधने आणि आर्थिक अडचणी यांना सामोरे जात त्यांनी शिक्षणाचा ध्यास कायम ठेवला. या प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा हा सर्वात मोठा आधार ठरला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, देवसिंगा नळ येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण दयानंद काशीनाथ आसावा प्रशाला, सोलापूर येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण घेत असताना दयानंद महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या प्रा. डॉ. कॅप्टन कीर्ती पांडे यांच्या प्रेरणेने त्यांनी एनसीसी मध्ये प्रवेश घेतला. एनसीसीच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि देशसेवेची जाणीव अधिक दृढ झाली.
पुढे त्या दयानंद महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची दखल घेत त्यांच्यावर दयानंद महाविद्यालयातील ३८ बटालियन एनसीसीच्या केअर टेकर ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.
त्यांच्या कार्याची दखल घेत पुढे त्यांना एनसीसीमध्ये ‘लेफ्टनंट’ ही प्रतिष्ठेची रँक प्राप्त झाली. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका मुलीसाठी हे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरले.
महाविद्यालयातील अध्यापनासोबत विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना ब्रिगेडियर, कर्नल आणि कमांडिंग ऑफिसर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमीच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालय व विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली.
याच काळात त्यांनी संशोधनालाही सुरुवात केली. एनसीसीबद्दल असलेल्या विशेष जिव्हाळ्यामुळे त्यांनी पीएच.डी.साठी “एनसीसीच्या माध्यमातून नेतृत्व विकास : पुणे ग्रुप मुख्यालयाच्या विशेष संदर्भात” हा विषय निवडला. या संशोधनातून एनसीसीच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण कसे विकसित होतात, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून पीएच.डी. पदवी नुकतीच मिळवली आहे. या संशोधनासाठी प्रा.डॅा.जैनेद्दिन के. मुल्ला यांनी सुलताना यांना मार्गदर्शन केले.
डॉ. सुलताना पठाण यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडिलांनी शिक्षणाबाबत नेहमी ठाम भूमिका घेतली, तर आईने प्रत्येक टप्प्यावर भक्कम साथ दिली. एकत्रित कुटुंबातील दोन आजोबा-आजी तसेच तीन काका-काकी यांचेही त्यांना सतत प्रोत्साहन मिळाले.
आज डॉ. सुलताना पठाण यांची कहाणी ग्रामीण भागातील असंख्य मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची जिद्द आणि स्वप्नांचा ध्यास कायम ठेवला तर यश मिळते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून मिळतो.
खेड्यातील मातीपासून सुरू झालेली ही वाटचाल आज पीएच.डी.च्या उंच शिखरापर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी अनेक तरुणींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवण्याची नवी प्रेरणा देत आहे.
0 Comments