राजेवाडी (ता. नाशिक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या पवित्र दिवसानिमित्त शाळा परिसरात आनंद व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ७.३० वाजता गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून एकता, शिस्त व राष्ट्रभक्तीचे प्रभावी दर्शन घडवले.
मुख्याध्यापकांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांनी जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनीही प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे केली. त्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूह नृत्य व एकल नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परमेश्वर परम सेवा फाउंडेशनच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे व पेनचे वाटप करण्यात आले. याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडीतील बालकांना बिस्किटे व फ्रुटी असा खाऊ देखील वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश हिरे यांनी परमेश्वर परम सेवा फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश हिरे सर, शिक्षिका सौ. सविता पाटील व सौ. वैशाली अहिरे, ग्रामपंचायतचे सरपंच टोपले सर, श्री. भूषण पवार, अंगणवाडी सेविका सौ. भागीरथी भिवसेन, परमेश्वर परम सेवा फाउंडेशन (PPSF) यांच्या सौ. सुनीता गवळी, विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments